Monday, April 2, 2012

दोन माजी मुख्यमंत्र्यांचा ‘आदर्श’ घोटाळ्यात संबंध?

दोन माजी मुख्यमंत्र्यांचा 'आदर्श' घोटाळ्यात संबंध?

सीबीआय सूत्रांकडून दुजोरा
प्रतिनिधी , मुंबई

altलष्कराच्या ताब्यातील भूखंडावर उभारण्यात आलेल्या आदर्श सोसायटीच्या घोटाळ्याच्या काळात राज्यात एकूण चार मुख्यमंत्री झाले असले तरी प्रत्यक्षात दोन माजी मुख्यमंत्र्यांचा थेट सहभाग असल्याचे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपासात स्पष्ट झाल्याचे खात्रीलायकरीत्या कळते. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नाव असले तरी आणखी एका माजी मुख्यमंत्र्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. सीबीआयकडून मात्र कमालीची गुप्तता पाळली जात असून या माजी मुख्यमंत्र्याचे नाव सांगण्यास नकार दिला जात आहे. या प्रकरणी आम्ही न्यायालयातच माहिती सादर करू, अशी भूमिका सीबीआयने घेतली आहे.
आदर्श सोसायटीच्या अपात्र सदस्यांना पात्र करण्यासाठी आपल्यावर राजकीय दबाव आला होता, असे मुंबईचे माजी जिल्हाधिकारी प्रदीप व्यास यांनी सीबीआयला सांगितले आहे. हा नेमका कुठल्या राजकीय नेत्याचा दबाव होता, याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला जात असल्याने व्यास यांच्या कोठडीत वाढ करावी अशी सीबीआयची मागणी होती. परंतु सीबीआयच्या आतापर्यंतच्या तपासात नेमक्या कुठल्या माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे, याची चाचपणी पूर्ण झाल्याचेही सूत्रांनी सांगितले.
'आदर्श' घोटाळ्याप्रकरणी व्यास यांच्यासह पी. व्ही. देशमुख, आर. सी. ठाकूर, एम. एम. वान्छू, ए. आर. कुमार आणि टी. के. कौल असे सहाजण सध्या सीबीआय कोठडीत आहेत. या प्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या फिर्यादीत एकूण १४ नावे आहेत. या सोसायटीचे प्रमोटर व काँग्रेस नेते कन्हैय्यालाल गिडवानी हेही सीबीआयच्या ताब्यात आहेत. उच्च न्यायालयाने आगपाखड केल्यानंतरच ही कारवाई झाली होती. न्यायालयाने आतापर्यंतच्या तपासावर समाधानही व्यक्त केल्याचा दावा सीबीआयने व्यक्त केला आहे. या प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अन्य सहाजणांवर अटकेची कारवाई होणार का, या प्रश्नावर सीबीआयच्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्याने थेट उत्तर देण्याचे टाळले. मात्र फिर्यादीत १४ नावे असली तरी या यादीच वाढ होण्याची शक्यता या अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.
आदर्श घोटाळ्याशी संबंधित फाईलीवरून तब्बल चार माजी मुख्यमंत्र्यांची नावे समोर आली आहेत. या मुख्यमंत्र्यांचा नेमका काय सहभाग आहे, याची चाचपणी केली जात आहे. त्यातून प्रत्यक्षात दोघा माजी मुख्यमंत्र्यांचा थेट संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत अटकेत असलेल्या आरोपींकडून याबाबतची संदिग्ध माहिती मिळत आहे. त्यामुळे उर्वरित आरोपींवर कारवाई करण्यासाठी निश्चित पुरावे हाती येण्याची वाट पाहत आहोत, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केल़े 

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Census 2010

Welcome

Website counter

Followers

Blog Archive

Contributors