Friday, March 30, 2012

चीअर लीडर्सची संस्कृती पराग फाटक

चीअर लीडर्सची संस्कृती
पराग फाटक

चीअर लीडर्सची संस्कृती
पराग फाटक

आयपीएलचे हंगाम येत गेले, वाढत्या संघाप्रमाणे चीअर लीडर्सची संख्याही वाढली.. कोण आहेत या चीअर लीडर्स? या सगळ्या कुतूहलांचा घेतलेला हा वेध. 


१८ एप्रिल २००८. दोन देशांदरम्यान होणाऱ्या क्रिकेटला बाजूला सारून ललित मोदींच्या फँचाइज पद्धतीच्या आयपीएलचा पहिला सामना सुरू झाला. मद्यसम्राट विजय माल्या यांच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या झहीर खानने पहिला चेंडू टाकला आणि क.क.क. किरण म्हणत अब्जाधीश झालेल्या शाहरुख खानच्या कोलकाता नाइट रायडर्स संघाच्या ब्रेंडान मॅक्युल्लमने हा चेंडू सीमारेषेपार भिरकावून दिला. पुढच्याच क्षणी डीजे म्हणजे संगीत आदळआपट मंडळींनी ताल धरला आणि टीव्हीवरच्या आणि मैदानात उपस्थित प्रेक्षकांना वेगळाच नयनसुख देणारा प्रकार पाहायला मिळाला. हातात झिरमिळ्या, मिनी खरंतर नॅनो स्कर्ट, वर तंग टॉप- त्याला टॉप म्हणण्यापेक्षा चोळी ही संज्ञा अगदी चपखल- त्यावर त्यांच्या फ्रँचाइजीचे नाव बोल्ड टाइपात आणि हाय-हिल्स शूज अशा कमनीय बांध्याच्या तरुणींनी तालबद्ध नाचायला सुरुवात केली. अवघी काही मिनिटंच.. झहीर पुन्हा रनअपवर आला आणि गौरांगना थांबल्या. बीसीसीआय संचालित आणि ललित मोदी यांचे ब्रेनचाइल्ड असलेल्या आयपीएलने पहिल्या फटक्यात चीअर लीडर्स हा आकर्षक आयटम पेश करीत भारतीय क्रिकेटरसिकांना क्लीन बोल्ड केले. खरंतर २००७ मध्ये झालेल्या पहिल्यावहिल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकापासूनच चीअर लीडर्स प्रकाराची सुरुवात झाली, मात्र त्या खऱ्या अर्थाने लाइमलाइटमध्ये आल्या त्या आयपीएलमुळेच. फोर, सिक्स गेल्यावर तसेच विकेट पडल्यावर नाचणाऱ्या या बया कोण, असा

चीअर लीडर्स , त्यांचे पोशाख याबद्दल उलटसुलट चर्चाना उधाण आले असतानाच पुणे वॉरिअर्स संघाच्या व्यवस्थापन सहाराने एक वेगळा प्रयत्न केला. त्यांनी देशी चीअर लीडर्स ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. भारतीय संस्कृती लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी भारतीय नृत्यांगना अशी त्यांनी कॉन्सेप्ट बनवली. भरतनाटय़म्, महाराष्ट्रातील लावणी, मणिपुरी, कुचीपुडी, हरयाणवी, बंगाली आणि मोहिनीयट्टम हे सात प्रकार या नृत्यांगना सादर करतात.

अगदी रास्त सवाल क्रिकेटरसिकांना पडला. क्रिकेट आपल्याकडे अगदी शाळकरी मुलांपासून आजोबांपर्यंत सगळेजण बघतात. आमचा चिंटू क्रिकेटची मॅच बघतोय हे कळल्यावर त्याची आई निर्धास्त असायची. पण मंदिरा बेदीच्या 'एक्स्ट्रा इनिंग' अवतारातील अँकरिंगनंतर क्रिकेटमध्येही 'ते तसलं' आलं याची खात्रीच समस्त मातांना पडली आणि आता चीअर लीडर्सना बघून तर प्रश्न आणखीनच चिघळला. चीअर लीडर्स- त्यांच्या कपडय़ांची लांबी, त्यांचे हावभाव, हालचाली हे सगळं पाहून संस्कृतिरक्षकांनी बंडाचं निशाण काढलं. चीअर लीडर्सचा आणि क्रिकेटचा काय संबंध, हा प्रश्न ऐरणीवर आला. आणि चक्क संसदेत फायनान्स समितीच्या कार्यकारिणीतही या मुद्दय़ावर खल झाला. अर्थात पुढे काही झालेच नाही.. नेहमीप्रमाणेच..
आयपीएलचे हंगाम येत गेले, वाढत्या संघाप्रमाणे चीअर लीडर्सची संख्याही वाढली.. कोण आहेत या चीअर लीडर्स? त्या नक्की असतात तरी कशाला? भारतातल्या प्रचंड उकाडय़ात-एवढय़ा लोकांसमोर नृत्य, कसरती कशा करतात? या सगळ्या कुतूहलांचा घेतलेला हा वेध.
चीअर लीडर्स
सगळ्या चिवित्र गोष्टींप्रमाणे चीअर लीडर्स या संकल्पनेचा उगमही अमेरिकतील. साधारणत: १८६९ मध्ये अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठाच्या बेसबॉल आणि फुटबॉल सामन्यांदरम्यान या चीअर लीडर्स प्रकाराची पहिल्यांदा नोंद झाली. त्या वेळी खेळाडूच बाकी खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम करीत होते. विशेष म्हणजे आता चीअर लीडर्स म्हणजे 'ललना'च असे समीकरण फिक्स्ड आहे. मात्र या परंपरेची सुरुवात पुरुष चीअर लीडर्सनी झाली.
आणि आता जसं तुम्हाला चीअर लीडर्स म्हणजे कामुक, काहीतरी अश्लील असं वाटतंय ना- तसं बिल्कुल नाहीये. जिम्नॅस्टिक्स, गाणे, नृत्य यांनी मिळून बनलेला हा एक खेळ आहे. हो खेळ. आता याला खेळ म्हणावे की नाही यावरून विचारपंडितांमध्ये खल आहे. असो. चीअर लीडर्स हा एक क्रीडाप्रकारच.
१८९४ मध्ये मिनोस्टा विद्यापीठाचा जॉनी कॅम्पबेल नावाचा एक पदवीधर तरुण फुटबॉलच्या सामन्यादरम्यान कंटाळला. यावर उपाय म्हणून त्याने खेळाडूंना आणि आपल्या संघाला म्हणजेच मिनोस्टाच्या नावाने विशिष्ट लयीत प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. सुसंबद्ध प्रकारच्या चीअर लीडिंग या दिवशी अस्तित्वात आलं. यानंतर त्यात गाणे, नृत्य, कसरती असे बदल होत गेले. साधारणत: १९०७च्या आसपास चीअर लीडिंगमध्ये महिलांचा समावेश झाला आणि यानंतर या क्षेत्रावर त्यांचीच मक्तेदारी आहे.
अमेरिकेत चीअर लीडिंग हे शालेय, महाविद्यालयीन प्रक्रियेचा हिस्सा आहे. नृत्य आणि जिम्नॅस्टिक्स हे कौशल्य असणाऱ्या मुलींना अगदी वयापासूनच प्रशिक्षण सुरू होते. केवळ प्रशिक्षण एवढंच याचं स्वरूप मर्यादित नाही. चीअर लीडिंगच्या स्थानिक म्हणजे गाव-शहर तसेच आंतरशालेय, राज्यपातळीवर आणि चक्क देशपातळीवर नियमित स्पर्धा घेतल्या जातात. आपापल्या शाळेत अव्वल असणाऱ्या मुली यामध्ये सहभागी होतात. मात्र हे सगळं अभ्यासाकडे दुर्लक्ष न करता. चीअर लीडिंगच्या निमित्ताने या मुली आपल्या नृत्यावर, शारीरिक कसरती यावर प्रचंड मेहनत घेतात. चीअर लीडिंग दिसायला आकर्षक असलं तरी प्रत्यक्षात यामध्ये लयबद्धता आणि शिस्तीची प्रामुख्याने गरज असते आणि त्यासाठीच मुलींना कठोर प्रशिक्षणातून जावे लागते. व्यावसायिक पातळीवर चीअर लीडिंगच्या अनेक प्रसिद्ध लीग आहेत. यापैकी काही म्हणजे एनबीए चीअर लीडिंग लीग, एनएचएल आइस डान्सर्स. आयपीएलदरम्यान दिसणाऱ्या चीअर लीडर्स बघून तुम्हाला हे काहीतरी थिल्लर चाललंय असं वाटू शकतं; मात्र तसं सर्वस्वी नाहीये. चीअर लीडिंगसंदर्भात काही आंतरराष्ट्रीय संघटना कार्यरत आहेत. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ चीअर लीडिंगची स्थापना १९९८ मध्ये जपानमधल्या टोकियोमध्ये झाली आहे. युनिव्हर्सल चीअर लीडिंग असोसिएशन, नॅशनल चीअर लीडर्स असोसिएशन अशा संघटना चीअर लीडर्ससाठी काम करीत आहेत.
चीअर लीडिंग या व्यवसायाचा पसारा आता जगभर पसरला आहे. क्रीडा क्षेत्रातील एक अग्रणी वाहिनी म्हणजे ईएसपीएन. या वाहिनीने १९९७ मध्ये चीअर लीडिंगच्या एका मोठय़ा स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं आणि सारं चित्रच पालटलं. २००० साली प्रदर्शित झालेल्या 'ब्रिंग इट ऑन' या चित्रपटामुळे चीअर लीडिंगची क्रेझ अजूनच वाढली.
चीअर लीडर्सची काही मुख्य कामं ठरलेली आहेत. स्टेडियममध्ये आपल्या संघांच्या, क्लबच्या खेळाडूंना, संघ-सदस्यांना प्रोत्साहन देणे आणि यासाठी आपल्या नृत्याच्या, कसरतींच्या माध्यमातून डायहार्ड पाठीराख्यांना, समर्थकांना आपल्या संघासाठी घोषणा देण्यासाठी, वाद्ये वाजवण्यासाठी प्रवृत्त करणे. एक प्रकारे संघाच्या विजयात मानसिकदृष्टय़ा भूमिका बजावणे हे चीअर लीडर्सचे प्रमुख काम आहे.
दुसरं महत्त्वाचं म्हणजे चीअर लीडर्सचा जो काही वावर असतो तो अगदी वेळेबरहुकूम असतो. विकेट पडल्यावर तत्क्षणी गाण्यावर त्यांचे पाय थिरकायला लागतात. यामध्ये थोडाही उशीर झाला तर गेली सगळी मजा. त्यामुळे खेळावर अचूक लक्ष ठेवून, स्टेडियममध्ये होणाऱ्या घोषणेकडे, आपल्या मॅनेजरच्या सूचनांकडे बारकाईने लक्ष ठेवून योग्य वेळी योग्य हालचाली करणे हा चीअर लीडर्सच्या कामाचा महत्त्वाचा भाग. 
चीअर लीडर्स एकेकटय़ा नाचत किंवा कसरती करीत नाहीत. त्यांची एक टीम असते. आता टीम आली म्हटल्यावर सगळ्यांमध्ये को-ऑर्डिनेशन हवं. एकोपा आणि लय हवी तरच परफॉर्मन्स 'कडक' होऊ शकतो. चीअर लीडर्स ज्याच्यासाठी एवढा अट्टहास करीत आहेत त्या संघासाठीही टीम म्हणजेच एकत्रित येणे अतिशय आवश्यक असते. यामुळे चीअर लीडर्सनाही वैयक्तिक पातळीवर काही मतभेद असतील तर ते बाजूला ठेवून स्टेडियमवर उतरावे लागते. याशिवाय दिसण्यावर चीअर लीडर्सना खूप काम करावे लागते. शरीर सुडौल ठेवण्याकरता चीअर लीडर्सना मेहनत घ्यावी लागते. याच्या बरोबरीने नृत्य-शारिरीक कसरती यासाठी अत्यंत फिट आणि लवचिक शरीराची गरज असते. विभिन्न वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता अंगी असणे अत्यावश्यक.
लास्ट बट नॉट द लिस्ट- कामात अधिकाअधिक अचूकता. चीअर लीडर्स प्रामुख्याने नाचतात, अ‍ॅरोबिक्स- जिम्नॅस्टिक्सच्या कसरती करतात, गातात आणि हे सगळे- हजारो प्रेक्षकांच्या समोर, अगदी 'लाइव्ह'. त्यामुळे या सगळ्या स्किल्समध्ये अधिकाअधिक अचूकता आणणे आलेच.
भारत हे क्रिकेटचे खूप मोठे मार्केट आहे. ललित मोदींनी या मार्केटची नस ओळखली. त्यांच्या सुपीक डोक्यातून आयपीएल म्हणजे इंडियन प्रीमिअर लीग ही संकल्पना जन्माला आली. ट्वेन्टी-२० षटकांचे सामने फ्रँचाइज-आधारित संघादरम्यानच्या स्पर्धेचा आराखडा त्यांनी बनवला. संघाची मालकी बडय़ा उद्योगघराण्यांनी घेतली. पण मोदींना माहीत होते की, एवढं सगळं असणं स्पर्धा यशस्वी होण्यासाठी पुरेसं नाही. कारण टीव्हीवर दिसणाऱ्या क्रीडा-वाहिन्यांद्वारे ३६५ दिवस, २४ तास आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे दुकान सुरूच असते. दुकान शब्द जरा मनाला लागतो, पण तोच योग्य आहे. याशिवाय विविध देशांतील स्थानिक सामनेही आता टीव्हीवर दिसतात. एवढं सगळं असताना आयपीएलच्या सामन्यांकडे प्रेक्षकांना कसं खेचायचं, हा यक्षप्रश्न होता. या प्रश्नाच्या उत्तरातूनच चीअर लीडर्स भारतात अवतरल्या. हा विचार तसा क्रांतिकारी होता. कारण मंदिरा बेदीसारख्या काही मंडळींचा अपवाद वगळता क्रिकेटचा सामना हा पूर्ण सुटाबुटातल्या क्रिकेट जाणकार मंडळींशी निगडित होता. पण बदलाचे वारे वाहू लागले होते. आतापर्यंत इंडियन करीने पोटे बिघडतात आणि भारतात सार्वजनिक वाहतूक हत्तींद्वारे होते असे वाटावे अशा पद्धतीने एलिफंट्स कंट्री म्हणणारे परदेशी खेळाडू मोदी कंपनीने दिलेल्या पैशाची ऑफर बघून चेकाळले. म्हणूनच तर भारतात आल्यावरही आपल्याच देशातले बरोबर आणलेले अन्न खाणारा जगविख्यात लेगस्पिनर शेन वॉर्न, आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ, पाकिस्तानचा सोहेल तन्वीर आणि अभिषेक राऊत, दिनेश साळुंके एकत्र नांदू लागले. या सगळ्या मिश्रणाला ग्लॅमरची फोडणी देण्यात आली आणि चीअर लीडर्सचा प्रवेश निश्चित झाला. चीअर लीडर्सच्या पोशाखाने भुवया उंचावणार, वाद होणार हे ओघाने आलेच. निगेटिव्ह पब्लिसिटी वर्क्‍सर्स.. भारतात तर नक्कीच.. त्यामुळे मोदी कंपनीला चिंता नव्हती. चीअर लीडर्स येण्याआधीच बॉलीवूडने 'कथानकाची गरज' या सबबीखाली पूर्ण कपडय़ात वावरणे सोडून दिल्याने फारशी चिंता नव्हती. एकंदरीतच पोशाखाच्या मर्यादा सैलावल्या होत्या. आता राहिला प्रश्न तो या तरुणींचे मैदानावर काय प्रयोजन? संघाला आणि फॅन्सना प्रोत्साहन देणे असे सांगण्यात आले. चीअर लीडर्स म्हणजे केवळ महिलाच असे नसते. काही पुरुष चीअर लीडर्सही असतात. महिलांप्रमाणेच त्यांनाही नृत्य, जिम्नॅस्टिक यातलं कौशल्य अवगत असावं लागतं. मात्र बहुतांशी फ्रँचाइजींचा कल महिला चीअर लीडर्स असण्याकडे असतो.
मॅचच्या दिवशी चीअर लीडर्सचे शेडय़ुल एकदम टाइट असते. सकाळी त्यांचा नृत्याचा सराव होतो. यानंतर ब्रेकफास्ट-शारीरिक कसरतींचा सराव- जेवण- विश्रांती- यानंतर संध्याकाळी मॅचकरिता स्टेडियमध्ये दीड-दोन तास आधीच त्या दाखल होतात. मॅच सुरू झाल्यापासून त्यांची डय़ुटी सुरू. सिक्स, फोर आणि विकेट या तीन गोष्टी चीअर लीडर्सच्या दृष्टीने एकदम महत्त्वाच्या. चीअर लीडर्सना एक छोटा मंच दिलेला असतो. वरील तीनपैकी काहीही घडले की त्यांना एखाद्या विशिष्ट व्यक्तीद्वारे अथवा इलेक्ट्रॉनिक मशीनद्वारे इशारा मिळतो आणि त्यांच्या आनंदाला उधाण येते. डीजेने ठरवून दिलेल्या गाण्यावर त्या नृत्य करतात, विकेट गेली तर थोडा जास्त वेळ मिळतो, तेवढय़ा वेळेत काही स्टंट्सही त्या करतात. याबरोबरीने आपल्या लवचिक शरीराचा उपयोग करीत त्या चित्तथरारक कसरती करतात. आपल्या संघाला प्रेरणा मिळेल आणि प्रेक्षक जागीच खिळून राहतील याची पुरेपूर दक्षता चीअर लीडर्स घेतात. जसजशी स्पर्धा पुढे सरकते तसा सामन्यांचा रोमांच वाढत जातो. अंतिम फेरीसाठी काही खास नृत्यप्रकार पेश केले जातात. 
विशेष म्हणजे आयपीएलच्या निमित्ताने आलेल्या चीअर लीडर्स युक्रेन, रशिया अशा क्रिकेटचा काहीही संबंध नसलेल्या ठिकाणांहून आलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना क्रिकेटचा गंधही नाही. त्यांना धोनी आणि श्रीलंकेचा कपुगेडरा दोन्ही सारखेच. त्यामुळे त्यांना आधी क्रिकेटचे बेसिक्स शिकून घ्यावे लागले. पण चीअर लीडर्स खऱ्या अर्थाने लाइमलाइटमध्ये आल्या त्या मॅचनंतरच्या पार्टीतील सहभागामुळे. मॅचचा शिणवटा घालवण्यासाठी फ्रँचाइजी प्रत्येक सामन्यानंतर दिमाखदार पार्टीचे आयोजन करीत. देशांतर्गत असो किंवा देशातील स्थानिक क्रिकेट- सगळ्याला संस्कारांची बैठक होती, मात्र आयपीएलने सगळंच एकदम स्पायसी, ग्लॅमराइज्ड होऊन गेलं. आयपीएलच्या निमित्ताने लाँन्च झालेल्या फ्रँचाइज-बेस्ड क्रिकेटमध्ये मॅचनंतर खेळाडूंना पार्टीत सामील व्हावे लागे. आणि याच पाटर्य़ा पुढे वादग्रस्त ठरल्या. पार्टीदरम्यान चीअर लीडर्स आणि खेळाडू यांच्यात जवळीक वाढत असल्याचे स्पष्ट होऊ लागले. नृत्य-जिम्नॅस्टिक्स याद्वारे प्रोत्साहनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या या तारका आता भलत्याच कारणांसाठी चर्चेत येऊ लागल्या. वृत्तपत्रांच्या पेज-थ्री पुरवण्यांमध्ये याबाबत खमंग चर्चा रंगू लागल्या. मात्र टाळी एका हाताने वाजत नाही. दक्षिण आफ्रिकेच्या गॅब्रिएला पॉस्किल्युटोने आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून तिची व्यथा मांडली. पार्टीमध्ये आमचा अक्षरक्ष: वापर करण्यात येतो, काही खेळाडू नको तेवढी जवळीक साधतात, असे बरेच गौप्यस्फोट तिने केले. विशेष म्हणजे भारतीय खेळाडूंचे वर्तन चांगले असते, असे तिने लिहिले. यामुळे संशयाची सुई कोणावर आहे हे उघड झालं आणि खळबळ उडाली. ग्रॅब्रिएला आपली व्यथा दक्षिण आफ्रिकेतील एका चॅनेलला सांगणार होती. चॅनेलकरिता ही एकदम सणसणीत स्टोरी होती; मात्र त्याआधाची या ब्लॉगने काही विशिष्ट खेळाडूंची कृष्णकृत्ये समोर आली. अर्थात गॅब्रिएलाने लिहिलंय ते सगळं खरं आणि खेळाडू चुकीचे, असा अर्थ निघत नाही. पण काही झालं तरी जे होत होते ते 'स्पिरीट ऑफ द गेम'ला झुगारूनच. गेल्या वर्षी आयपीएलचा ज्वर फिकाच ठरला. यामुळे वादाचा मुद्दा ठरलेल्या या पाटर्य़ा बरखास्त करण्यात आल्या. 
सुरुवातीला फक्त खेळ आणि खेळाडू यावर फोकस असणाऱ्या मंडळींचं या आकर्षक प्रकाराकडे लक्ष जाऊ लागलं. क्रिकेटबरोबर डोळ्यांचा व्यायामही होत असेल तर कोण दुर्लक्ष करेल. चीअर लीडर्स ज्या स्टॅण्ड्सच्या जवळ आहेत तिथली तिकिटे झटपट संपू लागली. भारतात क्रिकेट लोकांच्या धमन्याधमन्यांत पसरलंय. त्यामुळे आयपीएल संघ लोकप्रिय झाले आणि त्याबरोबरीने या संघांची ओळख असलेल्या चीअर लीडर्सही प्रसिद्धिझोतात आल्या. या टीमच्या चीअर लीडर्स एकदम सॉल्लिड आहेत अशा चर्चा ऐकायला मिळू लागल्या. ग्लोबलायझेशनच्या आक्रमणात मॉल्स, मल्टिप्लेक्स, ब्रँडेड वस्तू हे सगळं आपलं रुटिन होऊन गेलं. तसंच क्रिकेटमध्येही आलेल्या या बदलाला आपण आपलंसं केलं. आयपीएलचा पाचवा हंगाम आता येऊ घातला आहे. तेव्हा एकदा सज्ज होऊया एका नव्या दृष्टीने चीअर लीडर्सचा 'चीअर' अनुभवायला.
parag.phatak@expressindia.com

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Census 2010

Welcome

Website counter

Followers

Blog Archive

Contributors