Sunday, February 10, 2013

ओबीसी समाज धर्मातराच्या वाटेवर



Published: Wednesday, January 2, 2013

हिंदू धर्मातील वर्णवर्चस्ववादी व्यवस्थेतून बाहेर पडण्यासाठी इतर मागासवर्गातील (ओबीसी) अनेक समाजघटकांच्या संघटनांनी एकत्र येऊन राज्यभर धर्मातर अभियान सुरू केले आहे. 'आता ओबीसी बांधव बौद्ध धम्माच्या वाटेवर' असे या अभियानाला नाव देण्यात आले आहे. १४ ऑक्टोबर २०१६ ला नागपूरमध्ये लाखोंच्या संख्येने ओबीसींच्या धर्मातरासाठी ही तयारी सुरू आहे. देशातील प्रत्येक राज्यात एक याप्रमाणे पुढील तीन वर्षांत अशा परिषदा घेण्याचे नियोजन आहे.
  भारतीय समाजात संख्येने सर्वाधिक असलेल्या ओबीसी समाजाला स्वतची कसलीही ओळख नाही. हा समाज हिंदू धर्माचा एक भाग असला तरी, उच्चनीचतेच्या उतरंडीत त्याला खालचाच दर्जा दिला जातो. ओबीसींच्या नावाने करण्यात येणाऱ्या राजकारणाचा फायदा काही ठराविक नेत्यांनाच फक्त होतो. समाजाला त्याचा काहीच फायदा होत नाही. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसह धर्मातर करुन बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यानंतरच आंबेडकरी चळवळीला खऱ्या अर्थाने धार आली. पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य समाजाला एक वेगळी ओळख मिळाली. बुद्धिवाद व विज्ञानवादाच्या अधिष्ठानावर संपूर्ण भारतीय समाजाची फेरउभारणी करण्याचा आंबेडकरांचा प्रयत्न होता. तोच विचार स्वीकारण्याचा निर्णय ओबीसींनी घेतला असून धर्मातरापूर्वी या समाजात जागृती घडवून आणण्यासाठी राज्यभर अभियान सुरू केल्याची माहिती सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष हनुमंत उपरे यांनी दिली. धर्मातराचे अभियान सुरू करुन छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या प्रस्थापित राजकीय नेत्यांसमोर एक आव्हान उभे करण्याचाही त्यातून प्रयत्न सुरू असल्याचे मानले जात आहे
६ जानेवारीला पुण्यात परिषद 
 या अभियानाला गेल्या वर्षी नागपूरपासून सुरुवात झाली. गेल्या वर्षी १४ ऑक्टोबरला मुंबईत दुसरी परिषद झाली. तिसरी परिषद ६ जानेवारीला पुण्यात होणार असून त्यात ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले व डॉ. आ. ह. साळुंखे उपस्थित राहणार आहेत. औरंगाबाद व कोल्हापूरलाही अशाच सभा घेण्यात येणार आहेत.


व्होट बँक कमी होण्याच्या भीतीनेच ओबीसींची जनगणना टाळली जातेय...


Published: Sunday, February 10, 2013

देशातील व्होट बँक कमी होईल या भीतीपोटीच देशातील ओबीसींची जनगणना करण्याचे सरकारकडून जाणीवपूर्वक टाळले जात असून हा ओबीसींच्या विरोधातील राजकीय षडयंत्राचाच हा भाग असल्याचा आरोप येथे सुरू असलेल्या सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलनातील एका परिसंवादात करण्यात आला.
सत्यशोधक ओबीसी परिषदेच्या वतीने येथील शिवछत्रपती रंगभवनात सुरू असलेल्या दुसऱ्या राज्यस्तरीय सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी 'ओबीसींची जनगणना न करणे: सत्तेची भीती की राजकीय षडयंत्र?' या विषयावर परिसंवाद झाला. त्या वेळी वक्तयांनी चर्चेत भाग घेताना परखड मते मांडली. सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष हणमंत उपरे हे अध्यक्षस्थानी होते. या परिसंवादात प्रा. डी. ए. दळवी, लक्ष्मण ढवळे, पोपटराव गवळी आदींनी भाग घेऊन विषयाची मांडणी केली. 
ओबीसींचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण होईल या भीतीने राज्यकर्ते ओबीसीची जनगणना करीत नाहीत. देशात जनावरांची शिरगणती होते. परंतु ओबीसींची जनगणना का होत नाही,असा सवाल उपस्थित करताना प्रा. दळवी यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसींच्या हातात संविधानरूपी कंदील दिला आहे. त्याचा उपयोग करून ओबीसींनी स्वत:ची वाट स्वत: चोखाळली पाहिजे, असे मत त्यांनी मांडले. तर लक्ष्मण ढवळे यांनी आज ओबीसींचा कोणीच वाली नाही, कोणीच त्यांच्यासाठी धडपडत नसल्याचे नमूद केले. ओबीसीही थंड आहेत. स्वत:च्या अस्तित्वासाठी ओबीसींनी स्वत: रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची गरज आहे. ओबीसींनी प्रथम आपल्या डोक्यातील 'मनुवाद' काढून टाकावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात हणमंत उपरे म्हणाले, ओबीसींची जनगणना सहावेळी नाकारली गेली असून हा राजकीय षडयंत्राचाच भाग आहे. जनगणनेची जबाबदारी सरकारची आहे. ओबीसींच्या हक्कावर गदा आणली जात आहे. स्वत:चा सामाजिक व शैक्षणिक स्तर उचावण्यासाठी  ओबीसींनी एका छताखाली यायला हवे. देशात ३७४४ ओबीसींच्या जाती आहेत. या सर्व जातींची जनगणना व्हावी. परंतु व्होट बँक कमी होण्याच्या भीतीने सरकार ही जनगणना टाळत असल्याचा आरोप उपरे यांनी केला. या परिसंवादाचे सूत्रसंचालन प्रा. संजय क्षीरसागर व प्रा. रामेश्वर मोरे यांनी केले.

भुजबळांच्या कळवळ्यावर ओबीसी नेत्यांकडूनच आगपाखड

Published: Wednesday, February 6, 2013

सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ओबीसींचे नेते म्हणविले जाणारे छगन भुजबळ यांची उपमुख्यमंत्रीपद गमवावे लागल्यानंतरची राजकीय खदखद अधूनमधून बाहेर येत असली तरी ते ज्या घटकाचे प्रतिनिधीत्व करीत असल्याचा दावा केला जातो, त्यांच्याकडूनच आता भुजबळांच्या ओबीसींप्रती असलेल्या निष्ठेविषयी शंका व्यक्त करण्यात येऊ लागली आहे. छगन भुजबळ यांनी ओबीसी कार्ड केवळ स्वत:ची खुर्ची म्हणजे सत्ता-संपत्ती वाचविण्यासाठी वापरल्याचा आरोप सत्यशोधक ओबीसी परिषद आणि महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. राजकीय पक्षांशी संबंधितांनी केलेल्या आरोपांना वेगळी पाश्र्वभूमी असल्याने त्यांचे आरोप विशेष गंभीरपणे न घेणारे भुजबळ आता ओबीसी घटकातील नेत्यांकडूनच होणाऱ्या आरोपांना काय उत्तर देतात, या विषयी चर्चा सुरू झाली आहे.
ओबीसी समाजाला हिंदू धर्मात कधीच त्रास नव्हता व नाही. त्यामुळे धर्मातर करण्याची आवश्यकता नसल्याची भूमिका भुजबळ यांनी अलीकडेच 'लोकसत्ता' मध्ये मांडली होती. त्यांच्या या भूमिकेचे वेगवेगळे पडसाद उमटत आहेत. ओबीसी हिंदूंना वैज्ञानिक दृष्टिकोन असणारा बौद्ध धम्माचा पर्याय असल्याचे सांगून सत्यशोधक ओबीसी परिषदेने २०१६मध्ये नागपूर येथे बौद्ध धम्म दीक्षा कार्यक्रम आयोजित करण्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यासाठी सध्या जनजागृती केली जात आहे. या अनुषंगाने परिषदेचे अध्यक्ष हनुमंत उपरे व महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे अध्यक्ष लक्ष्मण ढवळे यांनी मंगळवारी नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत भुजबळांवर कठोर शब्दात टीकास्र सोडले. महात्मा जोतिराव फुले यांनी हिंदुत्ववादी परंपरेशी फारकत घेत सत्यशोधक धर्म स्थापला. परंतु त्यांचे नाव वापरून महात्मा फुले समता परिषदेच्या नावाने दुकानदारी करणाऱ्या भुजबळांना महात्मा फुलेंचे नाव घेण्याचाही अधिकार उरलेला नसल्याचे उभयतांनी नमूद केले. भुजबळांचे राजकारणातील वैयक्तिक दुखणे म्हणजे ओबीसींचे दुखणे नव्हे, असेही त्यांनी स्पष्ट केले. भुजबळांचे डोके दुखत असेल तर तमाम ओबीसींनाही डोकेदुखी झाली पाहिजे. भुजबळ ज्यावेळी आनंदात असतील, तर सर्व ओबीसींनी आनंदाने उडय़ा मारल्या पाहिजेत, अशी भुजबळांची ओबीसींच्या प्रती अपेक्षा आहे काय, असा टोलाही उपरे यांनी लगावला.
ज्या ज्या वेळी ओबीसीहिताची चर्चा अथवा विधेयक मंत्रिमंडळात येते, त्या त्या वेळी भुजबळ मौन बाळगून बसतात, असा आरोपही ढवळे व उपरे यांनी केला. १६ लाख कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत कायदा होऊनही अंमलबजावणी होत नाही. शिष्यवृत्ती व सहकार क्षेत्रातील ओबीसी संचालकांचे आरक्षण बंद अशा प्रकरणात ते शांत बसतात. या घटनाक्रमामुळे भुजबळ हे ओबीसी कार्ड केवळ स्वत:ची खुर्ची म्हणजे सत्ता-संपत्ती वाचविण्यासाठी वापरतात हे सिद्ध होत असल्याचा आरोप संबंधितांनी केला आहे.


No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Census 2010

Welcome

Website counter

Followers

Blog Archive

Contributors